‘शिंदेंनी उठाव केला नसता तर…’, संजय शिरसाट यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
आम्ही 115 आहोत तरीही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय. .'... तर भाजपच्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं'. असे शिरसाट म्हणाले.
मुंबई, ८ मार्च २०२४ : ‘शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलायची सवय आहे. भाजपने शिवसेना पक्षाचा सन्मानच केला आहे. आम्ही 115 आहोत तरीही आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचं आम्हाला समाधान आहे’, असे म्हणत रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलंच सुनावलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपच्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं.’, असं संजय शिरसाट म्हणाले, तर एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते सत्तेत आले आहे. त्यामुळे हे दोन्ही बाजूने बघितलं तर कुणी कोणाचंही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान, ‘केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे, पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आलेत, त्यांचा केसानं गळा कापू नये’, असे वक्तव्य करत रामदास कदम यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.