Buldhana Bus Accident : प्रवाशांची नावं झाली उघड मात्र ओळख नाही; नातेवाईकांनी घेतला मोठा निर्णय
नागपुरहून पुण्याला येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात झाला होता. ज्यात होरपळून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
बुलढाणा : येथील सिंदखेडाराजा नजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. मात्र अपघातात मृत्यू झालेल्या त्या 25 जणांची नावं उघड झाली असून त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याने प्रशासन आणि नातेवाईकांच्या सहमतीने सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी ‘डीएनए’ चाचणीचे काम सुरू असून ते जिकिरीचे असल्यानेच नातेवाईकांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर या सर्व मृतांवर बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर नागपुरहून पुण्याला येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात झाला होता. ज्यात होरपळून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.