येत्या काळात कॉंग्रेसमध्ये आणखी मोठी फूट पडणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाकीत

| Updated on: Feb 10, 2024 | 6:04 PM

उद्धव ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडणूकीत निवडून येणार नाही. त्यांना आता जनताच मतदानातून उत्तर देईल. त्यांच्या निष्क्रीय माणसाला जनता गावात फिरु देणार नाही अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मोदी यांच्या लाटेत सर्व पक्ष पत्त्यांसारखे कोसळतील असेही त्यांनी म्हटले आहे. जनताच आता त्यांनी योग्य धडा मतदानातून शिकवेल असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Follow us on

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : देशात मोदी यांच्या गॅरंटीच्या लाटेने सर्व पक्ष पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत आणि पुढील काळात कॉंग्रेसमध्ये इतकी मोठी फूट पडणार आहे की त्यांना उमेदवार उभारायला माणसं मिळणार नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करीत आहेत. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी म्हटले की चांगली गोष्ट आहे की कॉंग्रेसचे लोक वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. मागे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. परवा शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपात आले. जस जसे मोदींचे वादळ आणि मोदींची गॅरंटी महाराष्ट्रात येईल तसे सर्व पक्ष पत्त्यांसारखे कोसळतील असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांना येत्या काळात गावातही जनता फिरु देणार नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.