‘यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही…,’ काय म्हणाले प्रवीण दरेकर
मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करीत दोन दिवसांनंतर भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महायुतीतील भाजपा आमदारांची आज बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही उच्चारला तर त्यास ठोक उत्तर देण्याचा इशारा भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी दोन दिवस आराम घेण्याऐवजी आणखी थोडा आराम करावा, त्यांच्या सारख्या नेत्यांची समाजाला गरज असल्याचे ते म्हणाले.
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : ज्या किळसवाण्या पद्धतीने जरांगे पाटील बोलत आहेत. जरांगे पाटील यांच्यामागे बोलविता धनी म्हणून आघाडीतील नेते मंडळी आहेत. भाजपाच्या सर्व आमदारांची आज बैठक झाली. यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एकही शब्दही खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका आमदारांनी मांडल्याचे भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला ऐतिहासिक 10 टक्के आरक्षण मिळाले असल्याने मराठा समाज आनंदी आहे. असे असताना कोणी चढवा चढवीची भाषा करीत असेल आणि त्यास मनोज जरांगे बळी पडत असतील हे दुर्दैव आहे. रोहीत पवार, राजेश टोपे आणि दस्तुरखुद्द शरद पवार या राज्याला अस्थिर स्फोटक करण्याचा दुर्दैवी आणि केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यास ठोक उत्तर सरकार आणि मराठा समाजातील नेते देतील अशा इशारा दरेकर यांनी दिला आहे. खरंतर मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. ते हायकोर्टात ते टीकले सर्वोच्च न्यायालयाने देखील ते नाकारले नव्हते. परंतू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात आरक्षण टीकविता आले नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. परंतू मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतरही त्यांना प्रसिद्धीचा सोस लागला आहे. टीव्हीवर मी रोज दिसला पाहीजे, मी बोट दाखवेल ते झाले पाहीजेत. या अहंकारातून त्यांना फस्ट्रेशन आले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.