Video: 60 वर्षांपासूनचा संसार रस्त्यावर! औरंगाबादमधील लेबर कॉलनीवर चोख बंदोबस्तात हातोडा, 144 कलमही लागू

| Updated on: May 11, 2022 | 8:07 AM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नागरिकांना येथील घरांचा ताबा सोडण्यासाठी अखेरची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून बहुतांश नागरिकांनी घरांचा ताबा सोडला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी (Labour colony) परिसरातील मोडकळीस आलेली घरे पाडण्याची मोठी कारवाई करण्यात आली. यानिमित्त काही गोंधळ सदृश्य स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस आयुक्तांनी येथे कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं होतं. मोठ्या पोलीस बंदोबस्तात लेबर कॉलनीतील घरांवर हातोडा पाडण्यात आला. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी तसेच शस्त्रबंदीही लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे (Aurangabad district administration) आज पहाटेपासूनच ही कारवाई सुरु करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नागरिकांना येथील घरांचा ताबा सोडण्यासाठी अखेरची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून बहुतांश नागरिकांनी घरांचा ताबा सोडला आहे. तर काहीजण घरे सोडण्याच्या तयारीत होते. लेबर कॉलनी वासियांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. येथील घरांचा ताबा मिळावा म्हणून अनेकदा रहिवाशांनी कोर्टात धाव घेतली. मात्र प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासनाच्या बाजूने हा निकाल लागला. त्यामुळे आता येथील घरांचा ताबा सोडून नागरिकांनी पुढील कारवाई करू द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे 60 वर्षांपासून इथं राहत असलेल्या लोकांच्या घरावर गदा आली आहे. लेबर कॉलनीतील या वसाहतीत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती घरे देण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचे कुटुंबीय येथेच वास्तव्यास राहिले. काही घरे विकली गेली, त्यांचेही मालक इथेच आहेत. तर काहींनी पोटभाडेकरूदेखील ठेवले. मात्र ही जागा जिल्हा प्रशासनाची असून येथील नागरिकांनी ती ताबडतोब रिकामी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

Published on: May 11, 2022 08:06 AM