Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते; सभेची तयारी जोरात
राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. यास विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. आता तर राज्यातीलच नाही तर अयोध्येतूनही कार्यकर्ते या सभेला येणार आहेत, असे समजते.
पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. सभेची तयारी पूर्णपणे आम्ही करणार आहोत. स्टेजचे काम दोन दिवसांत पूर्ण करणार, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी दिली आहे. तर मनसेच्या सभेला विरोध करणे हे काय ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. ही मनसेची सभा आहे. त्यास विरोध करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. भीम आर्मीच्या (Bhim Army) जिल्हाध्यक्ष सुमित खामकर यांनी सभेला विरोध दर्शवला होता. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, मात्र मनसेने सभा घेणारच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.