एवढी सगळी ‘लुटारु गॅग’ बसल्यावर… मी आघाडीत…, राजू शेट्टी यांनी कुणावर साधला निशाणा?
राज्यातील सरकार असो वा विरोधक कुणाचेही शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. सगळीकडे लुटारूंची गॅग बसली आहे. थकीत एफआरपीसाठी येत्या 17 तारखेपासून माझी पदयात्रा सुरू होणार आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
पुणे : 4 ऑक्टोबर 2023 | शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून मला संसदेत पाठवायचं असेल तर एक मत द्यावं. थकीत एफआरपीसाठी येत्या 17 तारखेपासून माझी पदयात्रा सुरू होणार आहे. 522 किलोमीटर आणि 22 दिवस मी पदयात्रा काढणार आहे. 7 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत उसाच्या नव्या दराची मागणी करणार आहे. ऊसाची रिकव्हरी तपासणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. तर कारखाने अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार यांचे आहेत. मग तपासणी बरोबर होईल का ? हेड मास्तरच्या पोराचा पेपर हेडमास्तरनेच तपासल्यावर मार्क पैकीच्या पैकीच मिळतील. एवढी सगळी ‘लुटारु गॅग’ बसल्यावर शेतकऱ्यांचे कल्याण होणार का? सत्ताधारी आणि विरोधक यापैकी कुणाचेही शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे मी कुठल्याच आघाड्यांमध्ये जाणार नाही, असे स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.