शेवगावात आधी वादाचा आवाज अन् आता सन्नाटा; बेमुदत बंदचा काय होतोय परिणाम?
या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमधील व्यापाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईसाठी बेमुदत बंद पुकारलाय. या बंदचा आजचा चौथा दिवस असून बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) शहरात सोमवारी रात्री दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दगडफेक देखील झाली. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 250 ते 300 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ शेवगावमधील व्यापाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईसाठी बेमुदत बंद पुकारलाय. या बंदचा आजचा चौथा दिवस असून बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तर जोपर्यंत समाजकंटकांना अटक होत नाही. तोपर्यंत बंद सुरुच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत बंदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चुकीचे वर्तन करणा-यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत बंद मागे घ्यावा असे आवाहन सोमवारी केले होते. परंतु आजही शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तर आज काही संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.