‘केवळ टीका करण्यासाठी माध्यमांसमोर…’; खासदार सुनिल तटकरे यांचा राऊत यांच्यावर निशाना
खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून भाजपवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे
पुणे, 24 जुलै 2023 | राज्य सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांच्या गटाने प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून टीका होत आहे. तर खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून भाजपवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर टीका करताना, त्यांचा योग्य समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी, संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी काय म्हणावे, त्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही असे म्हणताना, केवळ टीका करण्यासाठी माध्यमांसमोर जाण्यास काही अर्थ नसल्याचा टोला लगावला आहे. तर टीका टिप्पणी पासून अलिप्त राहणे आणि राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम आम्ही करत आहोत, असे देखील तटकरे म्हणालेत. आम्ही ‘एनडीए’चे घटक असून मुख्यमंत्री पद दादांना मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही ते म्हणालेत. ते पुण्यातील बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सतेज करंडक व पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2023 च्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते.