अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून महायुतीत प्रवेश घेतल्यानंतर प्रथमच आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. सहा जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे. या भेटीचे निमित्त ठरले शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस ! शरद पवार यांना भेटण्यापूर्वी अजितदादांना बहिण सुप्रिया सुळे यांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर दिल्लीत खातेवाटपाच्या चर्चेसाठी आलेल्या अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली. यावेळी अजितदादा यांच्या सोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळलेले नाही. ही भेट राजकीय नव्हती तर पुतण्या आपले राजकीय गुरु असलेल्या काकांच्या भेटीला गेल्याचे म्हटले जात आहे.