“गद्दारांच्या मांडीवर आता ‘ते’ नऊ मंत्री येऊन बसलेत”, अंबादास दानवे यांची शिंदे गटावर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारताच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवरची स्थगिती देखील उठवली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारताच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवरची स्थगिती देखील उठवली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असं सांगत आमच्या पक्षातील 40 गद्दार तिकडे गेले होते. आता अजित पवार यांनी त्यांच्याबरोबर गेलेल्या आणि त्यांच्याबरोबर न गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही 25 ते 50 कोटी रुपयांचं निधी वाटप केलं आहे. आता आमचे शिवसेनेचे जे आमदार ओरडत होते. टाहो फोडत होते. आम्ही स्वाभिमानाने गेलो, असं सांगत होते. ते आमदार आता अजित पवारांच्या निर्णयावर काय बोलणार? यावर आता शिंदे गटाने उत्तर द्यावं, अशी माझी भूमिका आहे.ठाकरे गटाच्या आमदारांना कसल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही. हा आमच्या आमदारांवर झालेला अन्याय आहे. हा मुद्दा अधिवेशनात मांडला जाईल.