राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दानवे आक्रमक
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, जूलैपासून राज्याच्या अनेक भागात चार-चार वेळेस अतिवृष्टी झाली. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरीही शेतकऱ्यांचा टाहो सरकारला ऐकू येत नाही. यंदा राज्यात जी पहिली अतिवृष्टी झाली त्याची नुकसानभरपाई देखील अद्याप अनेकांना मिळाली नाही. हे शेतकऱ्यांपुढील सुलतानी संकट आहे. दुसरीकडे राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. 90, 95 मिलीमीटर पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात गुडघ्या इतकं पाणी आहे. सध्याचं पीक तर गेलचं पण पुढील पीक पण घेता येत की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळा जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं दानवे यांनी म्हटलं आहे.