मलंगगडकरांची तब्बल 75 वर्षांची तहान भागणार; 56 गावांमध्ये होणार नळाद्वारे पाणीपुरवठा
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवलं जात नव्हतं.
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात आज पर्यंत नळाने पाणी मिळत नव्हते. रहिवाशी पाण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहत होते. ही प्रतिक्षा तर किती असावी. तब्बल 75 वर्ष. हो तब्बल 75 वर्षांनंतर मलंगगड आणि परिसरातील 56 गावांची प्रतिक्षा आता संपूष्टात आली आहे. आता या 56 गावांना थेट पाणी नळाद्वारे मिळणार आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मलंगगड परिसरात 66 कोटींची कामं करण्यात येणार आहेत. यामध्ये मलंगगड परिसरातील सर्व 56 गावांमध्ये नळजोडण्या देण्यात येणार असून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जलजीवन मिशनच्या या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी स्थानिक आमदार गणपत गायकवाड, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये घरोघरी पाईपलाईन पुरवली जाणार असून पहिल्यांदाच प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. आज भूमिपूजन झाल्यानंतर उद्यापासून लगेचच या कामाला सुरुवात होईल आणि वर्षभरात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.