Anil Deshmukh | कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना
कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली होती.
कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला. मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी 5 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी देशमुख यांचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. ‘देशात फेडरल व्यवस्था आहे. ही व्यवस्था पोलीस, न्याय आणि इतर पातळीवर आहे. या व्यवस्थेच रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाची आहे. आपल्याला त्याच संरक्षण करावं लागेल. प्रत्येक राज्यात पोलीस यंत्रणा आहे. त्याच प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. प्रत्येक राज्यातील पोलीस विभाग त्या त्या राज्यातील गुन्ह्यांचा तपास करत असतो. एक राज्यातील पोलीस दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या गुन्ह्याचा तपास करत नाही. हा जर एखाद्या राज्यात गुन्हा घडला असेल आणि आरोपी दुसऱ्या राज्यात असेल किंवा इतर राज्यात काही महत्वाची माहिती असेल तर ज्या राज्यात गुन्हा घडला आहे, त्या राज्यातील पोलीस गुन्हा दाखल करतात. इतर राज्यात तपासाला गेल्यावर तिथल्या पोलिसांची मदत घेऊन तपास करत असतात. इथे मात्र वेगळंच सुरू आहे. सीबीआयला इतर राज्यात जाऊन तपास करायचा अधिकार नाही. जोपर्यंत राज्य तपास करा म्हणून सांगत नाही, तोपर्यंत सीबीआय तपास करू शकत नाही. इथे महाराष्ट्र राज्याने सीबीआयला तपास करण्यासाठी सांगितलेलं नाही. त्याचप्रमाणे सीबीआयनेही राज्य सरकारची परवानगी घेतलेली नाही. सीबीआय लाच प्रकरणाचा तपास करण्यात तज्ज्ञ नाही. त्यामुळे हा तपास बेकायदेशीर आहे,असा युक्तिवाद अमित देसाई यांनी केला आहे.