मंत्रिपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं मोठ विधान; म्हणाला, “अजितदादांमुळे मला जीवनदान…”
अजित पवार गटाचे नेते कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते शुक्रवारी पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे मनापासून आभार मानले.
जळगाव: अजित पवार गटाचे नेते कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते शुक्रवारी पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की, “मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो. ज्या दिवशी मला मंत्रिपद मिळालं त्या दिवशी माझी आई शेतात निंदणी करायला गेलेली होती. मंत्रिपद मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अजित दादांमुळे जीवदान मिळालं. त्यामुळे त्याची परतफेड करणे एवढेच मनात होतं. मला अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मंत्रिपदाची संधी मिळाली. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी मंत्री होईल. ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी सांगण्यात आलं की तुम्हाला कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यायची आहे तेव्हा मलाही शॉक बसला. पहिल्यांदा आमदार झालो, त्यानंतर मला आज कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. मोठ्या कालावधीनंतर अमळनेरला ही संधी मिळालीये, त्यामुळे फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासह जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कसा पुढे जाईल, याचा प्रयत्न मी करणार आहे. आतापर्यंत ज्या समस्यांसाठी आवाज उठवला आहे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष कसा होईल, याचाही प्रयत्न असेल.”