‘वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण…,’ काय म्हणाल्या अंकिता पाटील-ठाकरे
भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला मित्रपक्षाकडून इंदापूरात फिरु देणार नाही अशा धमक्या आल्याचे सांगत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी आपल्या वडीलांबाबत एकेरी भाषा खपवून घेणार नाही, प्रत्येकाने संस्कृती आणि पातळी सांभाळून बोलावे, अन्यथा आम्ही देखील ठाकरे शैलीत उत्तरे देऊ असे म्हटले आहे.
इंदापूर | 4 मार्च 2024 : भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला भाजपातील मित्रपक्षच धमकी देत असून आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी आपल्या वडीलांबाबत एकेरी भाषा स्टेजवरुन जे कोणी तालुकाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभवतीची मंडळी करीत आहेत. त्यांनी आपली संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावे अन्यथा मी त्यास ठाकरी शैलीतून उत्तर देऊ शकते असा इशारा अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिला आहे. इंदापूरात फिरु देणार नाही अशा धमक्या मित्रपक्ष देत असल्याची तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यास त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी उत्तर दिले आहे. इंदापूरात सध्याचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भारणे आहेत. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि पूत्र राजवर्धन पाटील यांनी जो आम्हाला विधानसभेत मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करु असे म्हटले होते. हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला रामराम करीत साल 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला आहे. त्यांची अंकिता पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांच्याशी विवाह केला आहे.