50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे?
शिंदे गटातील काही आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुखांवर थेट आरोप केले आहेत. मध्यंतरी रामदास कदम यांनी टोकाचे आरोप केले होते तर आता औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले आहेत.
दत्ता कानवटे, Tv9 मराठी, औरंगाबाद : आतापर्यंत शिवसेना आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप आपण पाहिले आहेत. बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) घेतलेली भूमिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली तर हे केवळ 50 खोक्यांसाठी केल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena Party) केला आहे. आता मात्र, टोकाचे आरोप होऊ लागले आहेत. रानडं व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित असलेले संदीपान भुमरे (Sandipan Bhumere) यांनी तर पक्षप्रमुख यांची नक्कल करुन मंत्रीपद देण्यासाठी ते किती रुपये घेत होते हे जाहिर भाषणामध्येच सांगून टाकले. शंकरराव गडाख यांना जलसंधारण आणि पालकमंत्री केले होते. त्या बदल्यात काय व्यवहार झाला होता हे देखील आपल्याला माहिती असल्याचे भुमरे म्हणाले आहेत. शंकरराव गडाख यांच्याकडून किती रुपये घेतले असा थेट सवालच भुमरे यांनी पक्ष प्रमुखांना विचारलेला आहे. याविषयी बोलले तर बैठकीतूनच निघून जाईल असे सांगितले जात होते. सत्ता आम्ही स्थानिक पातळीवर राबल्यामुळे आली होती. सत्ता काय यांच्या बापाची का असा सवालही त्यांनी केला आहे. भुमरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा तर साधलाच पण इतरांवरही टोकाचे आरोप केले. औरंगाबाद येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.