अजित पवार यांच्या निर्णयावर काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका, म्हणाला, ‘बरं झालं, जागा मोकळी झाली…’
राज्यातील राजकीय घडामोडीही बदलल्या आहेत. यावरून काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून भाष्य करताना अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
नांदेड : राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीवर ही त्याचा परिणाम झाला आहे. तर यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीही बदलल्या आहेत. यावरून काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून भाष्य करताना अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, जे गेले त्यांचा बद्दल टिका करायची नाही, पण गेले ते बरं झालं. जागा मोकळी झाली असं अशोक चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँगेसकडून विधानसभा निहाय बैठकीच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आयोजित जाहीर सभेत चव्हाण यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी जाणाऱ्याना थांबवण्याचे पवार साहेबानी प्रयत्न केले. मात्र जाणारे गेले. तर महाविकास आघाडीबाबत शरद पवार भुमिका स्पष्ट करतीलच, पण आता काँगेसला अधिक वाव आहे. जास्त जागा लढण्याची संधी चालून आल्याचेही चव्हाण म्हणाले. तर आता राज्यात दोनच प्रमुख पक्ष आहेत. काँगेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे यांच्या सोबत यावरून बोलणं झालं आहे. दोघे मिळून राज्यात महाविकास आघाडी कायम ठेवू, एकत्र येऊन, आगामी निवडणुका लढवू अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे चव्हाण म्हणाले.