कोल्हापुकरांची चिंतेत भर; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल; अवघा दीड फूटच बाकी
पुण्यासह रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार होत असून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
कोल्हापूर, 23 जुलै 2023 | राज्यातील काही जिल्ह्यांनी अतिवृष्टी झोडपून काढले असून पुण्यासह रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार होत असून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच असून राधागनरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 37.5 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्याला आज पासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने कोल्हापुरकरांच्या मनात धस्स झालं आहे. सध्या पंचगंगा नदीचे पाणी पातळी 37.5 फुटांवर असून नदी इशारा पातळीवर पोहोचायला अवघा दीड फूट कमी आहे. तर पंचगंगा नदीचे पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे. यामुळे गंगावेश ते शिवाजी पुल रस्त्यावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.