राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने बच्चू कडू यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “शिंदे गटातील आमदारांची गोची झाली”
अजित पवार युतीत सामील झाल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. तसेच अजितदादांच्या एन्ट्रीने एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बैठकाही बोलवण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे.
अमरावती : अजित पवार युतीत सामील झाल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. तसेच अजितदादांच्या एन्ट्रीने एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बैठकाही बोलवण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याचा विचार विनिमय, मंथन, चर्चा व्हायला हवी होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची आता गोची झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्रास होता. कामं होत नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचा मतदारसंघ फोडून त्यांच्या पक्षबांधणीचं काम सुरु होतं, असा आरोप होता. त्या आरोपालाच आता छेद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या माध्यमातून ज्यांनी उठाव केला त्यांच्याच डोक्यावर कुऱ्हाड मारण्याचं काम होऊ नये. हे जपणं फार महत्त्वाचं आहे.”