बच्चू कडू यांचे महिला आरक्षणावरून टीकास्त्र, ‘गुलामीत राहणारी महिला…, नवरोबाच काम पाहतात…’
जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाई या आरक्षणाशिवाय उभ्या राहिल्या. यावर संशोधन केलं पाहिजे. कोणताही कायदा राजकारणाच्या हातातलं बाहुलं बनता कामा नये. नाही तर केव्हा ईडीची कारवाई एकाच पक्षाच्या विरोधात होते, असं बोलल्यावर तुम्ही म्हणाल बच्चू कडू नाराज आहेत. पण, सत्य कोणीतरी बोलले पाहिजे.
सोलापूर : 20 सप्टेंबर 2023 | सोलापूरमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी कायर्क्रमात बोलतान आमदार बच्चू कडू यांनी महिलाविषयी धक्कदायक विधान केलं. संसदेमध्ये महिला आरक्षणाचे बिल मांडले गेले. महिलांना आरक्षणाचा अधिकार या बिलामुळे मिळणार आहे. मात्र, बच्चू कडू यांनी त्यावर खोचक टीका केलीय. आपला देश अजूनही अडचणीत आहे. कारण, इथे जाती धर्माचा मोठा पगडा आहे. इथे तिरंग्यासाठी दंगली होत नाही. तिरंग्यासाठी इथे लोक रस्त्यावर येत नाही. निळा, हिरवा, भगव्याचा अपमान झाला तर लोक तिरंगा विसरून जातात आणि रस्त्यावर येतात. त्यामुळे केवळ कायदे करून उपयोग नाही संस्कारही बदलले पाहिजेत असे ते म्हणाले. कर्तुत्वाने पुढे येणाऱ्या महिला आणि आरक्षणातून येणाऱ्या महिला यात फार मोठा फरक पडतो. त्याचे परिणाम त्या मतदारसंघात दिसतात. गुलामीत राहणारी महिला अद्यापही धर्माच्या आणि जातीच्या संकटातून बाहेर आलेली नाही. आजही 75 टक्के महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या क्रियाशील नाहीत. त्यांचे नवरोबाच सर्व काम पाहतात. त्यामुळे आरक्षणाची घाई करत आहेत ठीक आहे. पण, ते लोकांमध्ये रुजवावे लागेल. इथे कायदे पाळतं कोण? कायदे करणे ही राजकीय गरज असू शकते, असा टोला त्यांनी लगावला.