“रस्सीखेच नाहीच, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच”; काँग्रेस आमदाराचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
मुंबई, 17 जुलै 2023 | अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष हा काँग्रेस झाला. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने देखील याला परवानगी दिली. राष्ट्रवादीपेक्षा जास्त आमदार असल्यास विरोधीपक्ष नेते पद काँग्रेसकडे जाईल, असं जयंत पाटील म्हणाले. तर विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच मिळणार असा दावा काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे.