नाणारनंतर आता बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध? तगडा पोलिस बंदोबस्त; पुन्हा सर्व्हे
रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.
रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी आज सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या सर्व्हेला आजपासून सुरूवात होणार असून रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य सरकार सर्व्हे करण्यासाठी आग्रही आहे. तर बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणार आहे. तर रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.