मोठी बातमी : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, कुणी दिली धमकी?
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. दुपारपासून त्यांना हे धमकीचे फोन येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाख करण्याची कारवाई सुरु केलीय.
नाशिक : 13 ऑक्टोबर 2023 | मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये करण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात तू तू मै मै सुरु झालीय. उद्या होणाऱ्या सभेच्या खर्चावर मंत्री भुजबळ यांनी बोट ठेवले आहे. यावरून पुन्हा वादावादी सुरु झालीय. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मी एकटा मराठा आरक्षण अडवू शकतो का ? असा सवाल केलाय. शरद पवार यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळ, अनेक पक्ष आणि मराठा नेते आहेत त्यांनाही आरक्षणाबाबत विचारा. जरांगे पाटील मलाच कसे बोलू शकतात, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाला काही तसं उलटत नाही तोच आता महत्वाची बातमी समोर आली. छगन भुजबळ यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. दुपारपासून भुजबळ यांना अज्ञात लोकांकडून धमकीचे फोन येत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशा धमकीचे भुजबळांना फोन आले आहेत. याबाबत राष्ट्रवादीकडून पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे काम सुरू आहे.