स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी "महाविजय 3.0" अभियान सुरू करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. उद्या सुरू होणाऱ्या अधिवेशनात जे.पी. नड्डा, नितीन गडकरी आणि अमित शाह यांचे मार्गदर्शन मिळेल. या अभियानातून पक्षाची निवडणूक रणनीती आखली जाईल आणि सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष रणशिंग फुंकणार आहे. भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होणार असून मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर दुसऱ्या बैठकीत फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांसोबत संवाद साधतील. उद्या दिवसभर भाजप नेत्यांचे विचार मंथन होणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करतील. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाने होईल. तर दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात महाविजय 3.0 ची घोषणा केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनिती आखली जाईल.