‘आमचे ट्रीपल इंजिन सरकार चौथे आले तर काही हरकत नाही’; भाजपकडून सांगलीत काँग्रेस नेत्याला थेट ऑफर
यानंतर अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ३० च्या वर आमदार घेत घेट युतीच्या सरकारमध्येच प्रवेश केला. त्यानंतर आता राज्यात ट्रीपल इंजिनचे शिंदे-फडणवीस-पवार सरकार आल्याचे बोलले जात आहे.
सांगली, 24 जुलै 2023 | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं आणी महाविकास आघाडी सरकारला विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यानंतर एका वर्षांनंतर पूलाखालून भरपूर पाणी गेलं आहे. यानंतर अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ३० च्या वर आमदार घेत घेट युतीच्या सरकारमध्येच प्रवेश केला. त्यानंतर आता राज्यात ट्रीपल इंजिनचे शिंदे-फडणवीस-पवार सरकार आल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसला आता जागा नसून जागा फूल्ल झाल्याचा टोमना अनेक वेळा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी मारला आहे. आता सांगलीत देखील असाच किस्सा झाला. येथे सांगलीत महापालिकेच्या आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचा चिमटा भाजपचे नेते कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काढला. त्याचबरोबर खाडे यांनी, आमचे ट्रीपल इंजिन सरकार आहे. तर चौथे आले तर काही हरकत नाही असे म्हणताच कार्यक्रमात एकच खसखस पिकली. याचबरोबर त्यांनी, आता तुम्ही येऊ नका जागा फुल्ल झाली आहे. सभागृहात तुम्ही असल्याशिवाय मजा येत नाही असा टोला लगावताना आलात तरी काही हरकत नाही असे म्हटलं आहे. तर भर कार्यक्रमात अशी थेट ऑफर दिल्याने सध्या सांगलीत चर्चांना उत आला आहे.