आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे गटावर टीका, मतांसाठी दारोदारी कटोरा…
भाजपासोबत गद्दारी केली तेव्हापासून त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार.. आज मतांसांठी त्यांना दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भितीने शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, किंचित, माकपा, सपा हे सगळे एकत्र आले. भाजपा सोबत जेव्हा शिवसेना होती तेव्हा सन्माननीय नेतृत्व होते, मतदार होते, आमदारही होते. पण, भाजपासोबत गद्दारी केली तेव्हापासून त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार.. आज मतांसांठी त्यांना दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे. अशी टीका मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. आपण जनतेच्या सेवेत असून मुंबईकर हे पाहत आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपाचाच महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘हिंदुस्तान देख रहा है एक अकेला सबको भारी पड रहा है’ राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडेल असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.