‘नवनवीन लोकं, नवीन जबाबदाऱ्या, त्यामुळेच…’; लाठीचार्जवरील टीकेवर राष्ट्रवादीला भाजपचं प्रत्युत्तर
लाठीचार्ज घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर चारीकडून टीका होत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार आणि कडक शब्दात सरकारवर टीका केली.
आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा दोन दिवसांपुर्वी पार पडला. यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. या घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर चारीकडून टीका होत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार आणि कडक शब्दात सरकारवर टीका केली. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी, अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा मागिल मंत्री मंडळात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना झाली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना व व्यवस्था उभ्या केल्या होत्या. सरकारने आणि सरकारकडून आव्हाने केली जात होती. विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हटलं जात होतं. पण आता राष्ट्रवादीमध्ये आता नवनवीन लोकं तयार झाली आहेत. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत त्यामुळे ते अती उत्साही आहेत. पण हा राजकारणाचा विषय नाही असा खोचक सल्ला दिला आहे.