बावनकुळे यांच्यामुळे भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला, अमोल कोल्हे यांची टिका
श्रेय घ्यायचं असले तर ते भाजपाचं सरकार असते. जबाबदारी घ्यायची असेल तर मात्र मित्र पक्षांवर ढकलायचं. माझ्या माहिती प्रमाणे शिंदे गट आणि अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रीमंडळात अजूनही स्थान दिलेले नाही. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचे पाप हे भाजपाचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
पुणे | 27 डिसेंबर 2023 : शेतकरी आक्रोश मोर्चातून काही निष्पन्न होणार नाही असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपाचा शेतकरी विरोधी चेहरा बावनकुळे यांच्या अशा वक्तव्याने समोर आला आहे. कांद्याची निर्यात बंदीमुळे 60 लाख क्वींटल कांदा मार्केटमध्ये आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे 1200 कोटीचे नुकसान झाले आहे याविषयी बावनकुळे यांनी बोलायला हवे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधी सहा हजार आधी आठ हजार देत आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दिवसाला 17 रुपये किंमत अशी मानायची का? वर्षाला एक लाख रुपये खत आणि किटक नाशकावर खर्च होतात. 18 टक्के जीएसटी लादते. म्हणजे 18 हजार खिशातून काढून घेते आणि आठ हजार सन्मान निधी देते म्हणजे केंद्र एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात देते असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.