“शरद पवार यांच्या राजकारणापासून परिवारही सुटला नाही…”, अजित पवार यांच्या आरोपांवर भाजपाचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल काही गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या आरोपांनंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल काही गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या आरोपांनंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार आमच्या सर्वांसाठी आदरणीय आहेत. परंतू ज्या पद्धतीने अजित पवारांनी शरद पवारांचा संपूर्ण आलेख मांडला त्यावरून असं दिसतंय की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबाबतची विश्वासार्हताही कमी झाली. शरद पवारांना परिवारतही वारंवार खोटं बोलावं लागलं. म्हणजे या राजकारणापासून परिवारही सुटला नाही. अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावं लागलं, वेगळं व्हावं लागलं हे मांडलंच आहे. त्यामुळे हे कशामुळे झालं आहे हे पाहिलं पाहिजे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली आहे. मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटं बोलू शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद करत गंभीर विधानं केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र त्यावर विश्वास ठेवेल,” असं बावनकुळे म्हणाले.