छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ
याविषयी मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ फोनवर आले असता त्याची सत्यता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये नामातरणाचा वाद शांत होतो न होतो तोच आता धार्मिक दंगलीचा प्रयत्न झाला आहे. मुलांच्या किरकोळ भांडणाचा समाजकंटकांनी दंगल घडवण्यासाठी प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकिकडे मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू असून रोजे सुरू आहेत. तर दुसरीकडे रामनवमी आहे. याचा गैरफायदा घेत छत्रपती संभाजीनगर दंगल पेटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिस बळामुळे सध्या वातावरण शांत झालं आहे.
येथील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिरासमोर रात्री बारा साडे बाराच्या सुमारास मुलांच्या दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून दिल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तर सध्यस्थितीत सगळं नियंत्रणात असून येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसआरपी फोर्स ही तैणात करण्यात आली आहे. तसेच याविषयी मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ फोनवर आले असता त्याची सत्यता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.