शब्द देतो, फसगत होणार नाही. उपोषण मागे घ्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे मनोज जरांगे यांना आवाहन
मला वाटते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही थातूरमातूर काही करणार नाही. दूरगामी चांगले परिणाम असलेला निर्णय घेवू. जो निर्णय घेवू तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे. मराठा समाजाची फसगत होणार नाही. सरकार सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व नेते हजर होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची चिंता सरकारला आहे. सुसंवादासाठी आम्ही सर्वांना बोलवले होते. या बैठकीत सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काम करत आहे. त्याला वेळ दिला पाहिजे. तोवर त्यांनी उपोषण मागे घ्यावे असा ठराव केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार आणि सर्व पक्ष आपल्यासोबत आहोत. तुमच्या जीवाची आम्हाला काळजी आहे. समितीला वेळ द्यावा. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय एकमत झाले. दुस-या समाजाचे काढून न घेता दिले पाहिजे, यावरही एकमत झाले. सर्व कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. सरकार कुठेही कमी पडत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आम्ही मानल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या विनंतीस मान देवून उपोषण मागे घ्यावे. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.