अपशब्द वापरला हे सिद्ध करा, राजीनामा देईन; शिरसाट यांचे अंधारेंना आवाहन
राज्य महिला आयोगाने 48 तासात याप्रकरणी शिरसाट यांनी त्यांची बाजू मांडावी असेही निर्देश महिला आयोगाने शिरसाट यांना दिले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आणि उद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात सध्या चांगलाच वाद रंगला आहे. शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत, असे शब्द वापरले होते. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. तर छत्रपती संभाजी नगरच्या पोलीस आयुक्तांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 48 तासात याप्रकरणी शिरसाट यांनी त्यांची बाजू मांडावी असेही निर्देश महिला आयोगाने शिरसाट यांना दिले आहेत.
यादरम्यान शिरसाठ यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, माझा व्हिडीओ फिरत आहे. पण, त्यात कुठं अपमान केला माहिती नाही. सुषमा अंधारेंबाबत एकही अश्लील शब्द वापरल्याचं सिद्ध करून दाखवावं. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईल. तसेच, महिलेचा अपमान झाल्याचं सांगतात. मग महिलेने महिलेसारखं बोलावं, असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला आहे.