‘विरोधकांनी बीड जिल्ह्यात जरुर जावे, पण…,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
बीड जिल्ह्यात मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिस यंत्रणेसह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच गंभीर आरोप होत आहेत. या जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात गंभीर आरोप केले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विरोधकांना आवाहन केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बीड जिल्ह्याला नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि इतर नेत्यांनी भेट देत देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. बीड जिल्ह्यात विरोधी पक्ष नेत्यांनी जाण्यात काहीच हरकत नाही. परंतू तेथे जाऊन कोणी राजकारण करु नये. बीड जिल्ह्याचे पर्यटन करु नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या जिल्ह्याची बदनामी आता करु नये. गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीर जरुर आहेत. तेथे आमचे ज्येष्ठ मंत्री अजित पवार जाऊन परिस्थिती पाहून आले आहेत. सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री पोहचताचे असे नाही. बीडच्या परिस्थितीबाबत योग्य ती कारवाई सुरु आहे. दोषी कोहीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.