तोंडाला फडके बांधलेल्या जमावाकडून दगडफेक; मुख्यमंत्र्यांनी सांगितली A to Z स्टोरी
नागपूरमध्ये काल भडकलेल्या वादाची संपूर्ण स्टोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सांगितली.
नागपूर येथे झालेल्या राड्यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निवेदन केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले की, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. नागपुरातील महाल परिसरात विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता, अशी अफवा सायंकाळी पसरवली गेली. त्यामुळे 200 ते 250 चा जमाव त्या ठिकाणी जमला. हा जमाव नारेबाजी करू लागला. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलण्यास सुरूवात केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्याने गणेशपेठ पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना हंसापुरी भागात 200-300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तिसरी घटना भालदारपुरा सायंकाळी 7.30 वा. झाली. तिथे 80 ते 100 लोकांचा जमाव होता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत 33 पोलिस जखमी झालेत. त्यात 3 उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकी एका पोलिस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरीक जखमी झालेत. तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 2 रुग्णालयात आहेत. एक आयसीयूत आहेत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.