सत्यजित तांबे यांचे अभिनंदन पण, योग्य पातळीवर निर्णय घेऊ. कॉंग्रेस नेत्याची आली मोठी प्रतिक्रिया
विधान परिषद निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने निवडून आला त्याचे अभिनंदन. पण, जे राजकारण झाले ते व्यथित करणारे आहे. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठी यांना कळविल्या आहेत.
अहमदनगर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात विजय झाला. विजयानंतर त्यांनी थेट कॉंग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. मात्र, या घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे आहेत असा प्रश्न सातत्याने चर्चेला येत होता. पण, बाळासाहेब थोरात यांनी अखेर मौन सोडले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या थोरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने निवडून आला त्याचे अभिनंदन. पण, जे राजकारण झाले ते व्यथित करणारे आहे. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठी यांना कळविल्या आहेत. पक्ष आणि माझ्या पातळीवर आम्ही योग्य निर्णय घेऊ. काही लोक कसे राजकारण करत आहे हे या निमित्ताने पाहिले. कॉंग्रेसची जी वाटचाल आहे ती पुढे तशीच कायम राहिली पाहिजे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.