नागपूरात कॉंग्रेस सांगली पॅर्टन राबविणार?, आम्ही काय सतरंज्या उचलायच्या? महाविकास आघाडीत घमासान
एकीकडे राज्यात विधानसभा निवडणूकांचा बार उडाला असताना निवडणूकांसाठी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे.अशात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने महाविकास आघाडीत बैचेनी वाढली आहे. एकीकडे कॉंग्रेसचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी सामना सुरु असताना आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा देखील नागपूर पूर्व जागेवरुन ताळमेळ बिघडत चालला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना पूर्व नागपूर या मतदार संघावरुन महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस घमासान सुरु झाले आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर पूर्व मतदार संघावरुन कॉंग्रेसने रात्री बैठका घेतल्या आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत नागपूर्व जागा न सोडण्याचा निर्धार व्यक्त करीत वेळ पडली तर राजीनामे देऊ पण कॉंग्रेसचे सतरंजी उचलणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील जागांचा तिडा वाढतच चालला आहे. काल रात्री कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नागपूर पूर्व मतदार संघाबाबत गुप्त बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. सांगली पॅर्टन राबविण्याची या बैठकीत चर्चा झाल्याचे समजल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. आम्ही काय फक्त काँग्रेसच्या फक्त सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि नेते रविनिश पांडे यांनी केला आहे.