धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का ? काय म्हणाले ?
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने पुन्हा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. आपण मतदार संघात 8,200 कोटीची कामे केली. आता पुन्हा जनतेचे आशीवार्द मिळावेत यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी आल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.
मुंबई : कोल्हापूरातील हातकणंगले येथील शिवसेनेचे लोकसभा खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यांनी दादर येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेत आशीवार्द घेतले आहेत. त्यांनी आपण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार आणण्यासाठी गणपतीचे आशीवार्द घेतल्याचे सांगितले. हातकणंगले लोकसभा मतदार संघात साल 2019 रोजी धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकीटावर राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. आता धैर्यशील माने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. या मतदार संघातून यंदा राजू शेट्टी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनाने पुन्हा उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. तर सदाभाऊ खोत देखील महायुतीतून भाजपाच्या समर्थनाने येथून निवडणूक लढवू इच्छीत आहेत. तसेच शौमिका महाडिक यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे हातकणंगले येथून कोणाला तिकीट मिळते याकडे लक्ष लागले आहे. कालच रात्री दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व रणनीती ठरविण्यात येऊन आपल्याला अबकी बार 44 पार करायचे असल्याच्या सूचना देण्यात आल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले.