राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे, मन आणि हृदय असते तर…; राऊतांचा श्री सेवकाच्या मृत्यूवरून सरकारवर हल्लाबोल
तर अनेकांनी चौकशीची मागणी केली होती. तर खारघरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्काराने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. पण या कार्यक्रमात उष्माघाताने 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागलं. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. तर अनेकांनी चौकशीची मागणी केली होती. तर खारघरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदनशिल हा शब्द या सरकारसाठी फार सोपा आहे. सरकारला मन आणि हृदय असते तर श्री सेवकाच्या मृत्यूचे प्रकरण दडपलं नसतं. ज्या प्रकारची चौकशी व्हायला हवी होती ती झाली नाही. सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती असल्याचे राऊत म्हणाले.