शेत तर हिरवं होणारचं आता मनही प्रफुल्लीत झालं आहे; पावसाच्या सरी कोसळल्याने ग्रामीण भागात पेरणीची धांदल
अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुबार पेरणी करण्याची नामुष्की बळाराजावर आली आहे. तर फक्त पावसासाठी मोठा शेतकरी वर्ग हा पेरण्यासाठी थांबला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पेरण्या फक्त पाऊस नसल्यामुळे थांबल्या होत्या.
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे हे आकाशाकडे लागले होते. अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुबार पेरणी करण्याची नामुष्की बळाराजावर आली आहे. तर फक्त पावसासाठी मोठा शेतकरी वर्ग हा पेरण्यासाठी थांबला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पेरण्या फक्त पाऊस नसल्यामुळे थांबल्या होत्या. पण आता गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. भात, सोयाबिन, भुईमूग पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात जिल्ह्यात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने त्याच्याआधी पेरण्या आटोकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पहायला मिळत आहे. अशातच कोल्हापूरमधील शेतकरी महिला या पारंपारिक गाणी गुणगुणत पेरणीच्या कामात व्यस्त आहेत.