‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका
दोन एक वर्षांपुर्वी भाजपवर थेट नाराजी व्यक्त करत मराठवाड्यात जोरदार धक्का ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
औरंगाबाद : 20 ऑगस्ट 2023 | सध्या आगामी निवडणुकांवरून मोर्चे बांधणीस सुरूवात झाली आहे. सगळेच पक्ष आता जागा वाटप आणि उमेदवारांची चाचपणीला लागले आहेत. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मतदारसंघनिहाय दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान भाजपला दोन वर्षांपुर्वी राम राम ठोकणाऱ्या आणि राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केलले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर सडकून टीका केली आहे. भागवत कराड म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी स्थिती आहे. पण भागवत कराड या रोपाला येथील वातावरण सुट होणार नाही. मान टाकेल. त्यामुळे हे रोपटं या मातीत पणपणार नाहीत. कराड निवडणुकीला उभे राहिले तर डिपॉझिट जप्त होईल. तर औरंगाबादला आता खासदार हा शिवसेनेचा असेल असे ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.