चिपळूणमध्ये राजकारण पेटलं? अजित पवार समर्थक आमदाराला शिंदे गटाच्या माजी आमदराचे आव्हान
येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपांचे त्रांगडे युती समोर उभ राहणार आहे. येत्या वर्षभरात लोकसभा लागण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ विधानसभा लागतील. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रत्येक मतदार संघात चाचपणी सुरू केली आहे.
रत्नागिरी, 03 ऑगस्ट 2023 | सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सत्तेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपांचे त्रांगडे युती समोर उभ राहणार आहे. येत्या वर्षभरात लोकसभा लागण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ विधानसभा लागतील. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रत्येक मतदार संघात चाचपणी सुरू केली आहे. याचवेळी रत्नागिरी-चिपळूण विधानसभा मतदारसंघातून युतीत ठिकणी पडणारी बातमी आली आहे. येथे शिंदेंच्या शिवसेने गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आगामी निवडणूक आपणच लढणारच असल्याचे म्हटल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी चव्हाण यांनी आपण येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तसे संकेत दिल्याचं म्हटलं आहे. तर येथे अजित पवार गटाचे समर्थक शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. आता चव्हाण यांनी येथून दंड थोपाटल्याने त्याचा परिणाम चिपळूण विधानसभा मतदारसंघावर होऊ शकतो. मात्र तशी शक्यता देखील नसल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे.