गिरीश महाजन यांचे भाषण, आंदोलकांचा गोंधळ, मनोज जरांगे म्हणाले, तुमच्यासाठी मरायला बसलोय…
मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताच आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी महाजन यांच्या भाषणात व्यत्यय आणला. मनोज जरांगे यांनी आपल्या हाती माईक घेत तुमच्यासाठी मरायला बसलोय, तुमची शायनिंग .... असे म्हणत गोंधळी कार्यकत्यांना आवरले.
जालना : 05 सप्टेंबर 2023 | मंत्री गिरीश महाजन यांच्या नेत्तृत्वाखाली मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने जालना येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची भेट घेत उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. सुमारे दीड दोन तास त्यांची चर्चा सुरु होती. मात्र, मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले. मनोज जरांगे यांनी सरकारला आणखी चार दिवसांची वेळ वाढवून दिली. या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन हे उपस्थितांना माहिती देत होते. जालना येथे जी घटना घडली त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. अशी घटना घडल्यानंतर माफी मागायलाही मोठेपणा लागतो असे महाजन म्हणाले. त्यावर आक्षेप घेत काही आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गिरीश महाजन बोलतच राहिले. जरांगे पाटील त्यांना माईक माझ्याकडे द्या अशी विनंती करत होते. पण, महाजन बोलत राहिले आणि गोंधळ वाढतच होता. अखेर महाजन यांनी जरांगे यांच्य्कडे माईक दिल्यानंतर त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘तुमच्यासाठी मरायला बसलोय…’ अशा शब्दात झापले.