‘मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं, अन्यथा 21 तारखेला…’, मनोज जरांगे काय म्हणाले
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाचे राज्य मागासवर्ग आयोगाने सुरु केलेले सर्वेक्षण संपले असल्याने आता सरकार त्यावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन भरवून चर्चा करणार आहे. त्यानंतर मराठ्यांच्या आरक्षणाचा कायदा पास होणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे अन्यथा आपण....
जालना | 18 फेब्रुवारी 2024 : मराठ्यांच्या स्थितीबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्य सरकार आता 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे की ओबीसीतून हे सरकारने अजून स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांचेही लक्ष लागले आहे. त्यातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अमलबजावणी करावी अन्यथा 21 तारखेला आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करू असे म्हटले आहे. मराठ्यांना आता तातडीने दिलासा देण्यात यावा. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले. आणि मर्यादा जर पन्नास टक्क्यांवर गेली आणि कोर्टाने जर हे आरक्षण बेकायदा ठरविले तर उपयोग काय ? त्यामुळे मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.