रायगडमध्ये ठाकरे गटाला लॉटरी, माजी आमदाराची कन्या शिवबंधन बांधणार
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून तगडा प्लॅन आखला जात असून त्यासाठी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनाच शिवबंधन बांधलं जाणार आहे.
रायगड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे गट, शिंदे गट तयार झाला. आज शिंदे गट हा खरी शिवसेना झाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे गटात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जेथे जेथे शिंदेंचे आमदार असतील तेथे विरोध निर्माण केला जात आहे. याचअनुशंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शह देण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी कोकणात लक्ष केंद्रीत केलं जात आहे. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून तगडा प्लॅन आखला जात असून त्यासाठी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनाच शिवबंधन बांधलं जाणार आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप असून त्या काँग्रेस पक्षाच्या आहेत. तर स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. स्नेहल यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेससाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे.