पेशव्यांचा अपमान… भालचंद्र नेमाडे यांना शिकवणार अक्कल, कुणी दिला इशारा?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ज्या पेशव्यांनी आयुष्य वेचलं त्यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले अशा विकृत माणसाचा निषेध...
मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी पुण्याहून हिंदू महासंघ अध्यक्ष आनंद दवे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे आले होते. याठिकाणी भालचंद्र नेमाडे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम सुरु होता. मात्र, विरोध करणाऱ्या हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काशी विश्वेशराचे मंदिर ज्याने फोडले त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण नेमाडे करत आहेत. समर्थन करताहेत त्या कृतीचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ज्या पेशव्यांनी आयुष्य वेचलं त्यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले अशा विकृत माणसाचा निषेध करण्यासाठी जमलो. भालचंद्र नेमाडे ज्येष्ठ असले तरी श्रेष्ठ नक्कीच नाहीत. त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा हिंदू महासंघ वारंवार जिथे त्यांचे कार्यक्रम असेल तिथे विरोध करेल. भविष्यात जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा त्यांना अक्कल शिकविल्याशिवाय रहाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.