मला स्वत:ला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थानापन्न झाले आहे. सरकारच्या खाते वाटपाचा तिडा नुकताच सुटला असताना आता पालकमंत्री पदावरुन वाद सुरु आहेत. या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महायुती सरकारच्या खातेवाटपाचा एकदाचा तिडा सुटला आहे. परंतू आता पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. आता पालकमंत्री पदाबाबत नागपूर येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की मुख्यमंत्री कुठल्याही जिल्ह्याचं पालकत्व ठेवत नसतात. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे सर्व घटक पक्षांशी बोलून पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील. पत्रकारांनी यावेळी बीडचे पालकमंत्री होण्याची मागणी होत आहे असा प्रश्न केला. यावर बोलताना ते म्हणाले की, मला जर बीडचे पालकमंत्री केले तर मी अवश्य ते स्वीकारेल परंतू मला स्वत:ला गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला आवडेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गडचिरोली येथील नक्षलवाद मोडून काढण्यात येणार असून येथील विकास मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.