आमचं सरकार आलं तर बहिणींना तीन हजार रुपये देणार, गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
राज्यात निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील केलेली कामे पाहात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून विरोधकांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
प्रत्येकाला वाटते आपलंच सरकार येईल. आम्हाला असे वाटते की आम्ही केलेली कामे पाहाता आमचं सरकार येणार आहे असे शिंदे गटाचे नेते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याप्रमाणे राज्यात फिरत आहे. 14 वेळा हा माणूस आपल्या जळगाव जिल्ह्यात आला आहे. सरकार आपल्या दारी सारख्या योजना सरकारने राबविल्या, जागेवर जाऊन लोकांना योजना दिल्या आहेत. महिलांसाठी एसटी प्रवास, लाडकी बहिण योजना, मोफत शिक्षण अशा योजना सरकारने आणल्या आहेत. होमगार्ड, कोतवाल, पोलिस पाटील यांचे पैसे वाढविले आहे. शिक्षकांसाठी 20 वरुन 40 वर केलेला टप्पा आहे. आरोग्यासाठी दीड लाखापर्यंत तरतूद होती ती पाच लाख केली आहे त्यामुळे या निवडणूकांत पुन्हा महायुतीचे सरकार येईल असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे आणि आमचं सरकार आले तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आमचे सरकार देईल असेही पाटील यांनी सांगितले.