समविचारी आहात तर मग पक्ष आणि चिन्हासाठी आग्रह का? सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला काय आहे सल्ला?
सध्या शिवसेना कुणाची हा वाद कोर्टात सुरु आहे. पण शिवसेनेसाठी कोर्टात लढावे लागत असेल तर बाळाबसाहेबांना काय वाटले असते, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर : राज्यात सध्या जे पक्ष आणि चिन्हावरुन सुरु असलेलं राजकारण (Politics) हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीला न शोभणारे आहे. तुमच्यावर पक्षाने कारवाई केली असेल तर तेव्हा पक्षच माझा असे भांडत बसण्यापेक्षा आपले वेगळे घर करुन आपले विचार जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. पण असं ओरबडून सर्वकाही मिळेल अस नाही म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे गटावर बोचरी टीका तर केलीच आहे पण अप्रत्यक्षरित्या त्यांना सल्लाही दिला आहे. याकरिता त्यांनी शरद पवार यांचेच उदाहरण दिले आहे. कॉंग्रेस पक्षाने जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा सर्वकाही माझेच म्हणत ते भांडत बसले नाहीतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्याची आठवण त्यांनी शिंदे गटाला करुन दिली आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पक्षासाठी कोर्टात जाणे म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील याचा तरी विचार होणे गरजेचे होते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.