गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे यांचा धक्कादायक आरोप
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पाडून आमदारांना सोबत घेत आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सत्तानाट्यावेळी दोन आमदारांना हॉटेलात बेदम मारहाण झाली होती. एका आमदाराने दारूच्या नशेत हॉटेलातील एअरहोस्टेसचा विनयभंग केल्याचा धक्कादायक आरोप निर्भय बनो अभियानाचे ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
धाराशिव | 4 मार्च 2024 : दोन वर्षांपूर्वी 2022 च्या जून महिन्यात शिवसेनेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आमदारांना गुवाहाटीच्या हॉटेलात बंदिस्त केले होते, त्यावेळी दोन आमदारांना मारहाण झाली होती. एका आमदाराने तर एअरहोस्टेसचा विनयभंग करून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रसिध्द वकील असीम सरोदे यांनी धाराशीव येथील ‘निर्भय बनो’ सभेत केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. गुवाहाटीत जे सत्तानाट्य घडले त्यावेळी गुवाहाटीचे संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आले होते. परंतू स्पाईस जेट आणि इंडीगो या दोन कंपन्यांच्या एअरहोस्टेस निवासस्थानाची सोय तेथे करण्यात आली होती. त्यांचा वर्षांचा कॉन्ट्रक्ट झाला होता. यावेळी आमदारांनी दारुच्या नशेत एअरहोस्टेसचा विनयभंग केला. सत्तानाट्यात एक आमदार पळून गेला होता. त्याला आठ किलोमीटरवरून पकडून आणण्यात आले आणि मारहाण करण्यात आल्याचे वकील असीम सरोदे यांनी भाषणात सांगितले आहे. हे दोन आमदार कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणी देखील ॲड. असीम सरोदे यांनी या भाषणात केली आहे. असा आमदार खरेदी विक्रीचा पैशाचा खेळ यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही अशी शपथ घेऊया असेही त्यांनी भाषणात म्हटले.